Thursday, 21 March 2013

नाट्यशास्त्र - नाट्यधर्मी व लोकधर्मी.



रंगभूषेच्या दृष्टीने दोन प्रकारांत नाटके विभागली जातात : (१) नाट्यधर्मी व (२) लोकधर्मी. रंगभूमीवर पडणाऱ्‍या प्रखर प्रकाशामुळे नाक, डोळे, ओठ, गाल इ. चेहेऱ्‍याचे भाग अस्पष्ट होतात. ते नीट दिसण्यासाठी मूळच्या रंगापेक्षा वेगळे रंग लावून ते ठसठशीत करावे लागतात. हा रंगभूषेचा मूळ उद्देश आहे. नंतर भूमिकानुरूप रंगभूषा वगैरे भाग असतो. त्यामुळेच रंगभुषेच्या दृष्टीने नाटके विभागली गेली आहेत
प्रस्तुतीकरण सांकेतिक वा निश्चित शैलीकरणाने केले गेल्यास त्यास नाट्यधर्मीम्हणतात. नाट्यधर्मी नाटके जास्त कृत्रिमतेकडे झुकणारी असतात. ही नाटके प्रामुख्याने ऐतिहासिक, पौराणिक व काल्पनिक असतात. रंगीबेरंगी भडक नेपथ्य, भरजरी पोशाख व चमचमणारे दागिने या सर्व झगमगाटातून चेहराही तेवढाच उठावदार दिसण्यासाठी त्यातील पात्रांची रंगभूषा भडक स्वरूपाची करावी लागते. या प्रकारात अधिक सहेतुकता, पूर्वयोजना आणि पूर्वकल्पना दिसून येते.
लोकांचे नैसर्गिक वर्तन रंगमंचावर जेव्हा प्रस्तुत केले जाते, तेव्हा त्यास लोकधर्मीम्हणतात. लोकधर्मी नाटके सामाजिक व वास्तवदर्शी असतात. उलट लोकधर्मी नाटकांतील सर्व पात्रे वास्तव समाजातील असल्याने त्यांची रंगभूषा सफाईदार कौशल्याने वास्तवदर्शी करावी लागते. लावलेला रंग प्रेक्षकांना तर कळणार नाही; परंतु चेहरा परिणामकारक दिसेल अशी किमया साधावी लागते. 
हे सर्व साधण्यासाठी जी साधनसामग्री लागते, तीत प्रामुख्याने तळाचा रंग (फाऊंडेशन्स), विविध छटांचे रंग (लायनिंग कलर्स), भुवई (आय ब्रो) पेन्सिल, ओठाच्या रंगकांड्या (लिपस्टिक), क्रेप-हेअर, केसांचे टोप, गोट्यांसाठी टोप्या, विविध प्रकारचे टकलांचे टोप इत्यादींचा समावेश असतो. या सामग्रीत जरूरीप्रमाणे रबर (लॅटेक्स), कापूर, टिश्यू पेपर, कृत्रिम दात (जे मूळच्या दातावर बसू शकतात) यांची भर पडते. रंगभूषेच्या सामानाची पेटी ही जणू जादूची पेटीच असते. 
कोणत्याही कलेत व म्हणून नाट्यात कमीअधिक प्रमाणात निश्चित शैलीयुक्तता असतेच. अगदी लोककलांचाही त्यास अपवाद नसतो. म्हणजे लोकधर्मीसुद्धा कमी प्रमाणातील नाट्यधर्मी होय. फक्त लोकधर्मी हा अधिक वास्तवदर्शी असा प्रस्तुतीकरणाचा मार्ग असतो व त्यामुळे दैनंदिन जीवनाचे त्यात प्रतिबिंब दिसते; तर नाट्यधर्मी हा अधिक सांकेतिक मार्ग असून तो पुराणकथा (याही मुळात सांकेतिक असतात) इत्यादींच्या प्रस्तुतीकरणास अधिक योग्य असतो.

No comments:

Post a Comment