Thursday, 21 March 2013

रस




हा काव्याचा त्याचप्रमाणे नाट्याचा आत्मा आहे. रस म्हणजे एक विशिष्ट प्रकारची चित्तवृत्ती होय. आपण एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेतो म्हणजे त्या गोष्टीतील रसाचा अनुभव घेत असतो.ही एक संस्कृतातील संकल्पना असून विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसनिष्पत्ती होते.
नाट्य आणि काव्यशास्त्रातील हे रस संख्येने आठ असून या स्थायीभावांचे या रसांत पर्यावसन होते. ते स्थायीभाव म्हणजे रति, उत्साह, शोक, क्रोध, भय, विस्मय, हास आणि जुगुप्सा असे भरताच्या मताने आहेत. या स्थायीभावांचे अनुक्रमे शृंगार, वीर, करुण, रौद्र, भयानक, अद्‌भूत, हास्य आणि वीभत्स असे आठ रस होतात. पण या स्थायी भावांना रसरूप येण्यास त्या त्या भावांना अनुरूप असे विभाव, अनुभाव आणि संचारी वा व्यभिचारी भाव हे अस्तित्त्वात यावे लागतात.
भारतमुनींनी आठ रस सांगितले होते.पण त्यातही शृंगार, वीर, रौद्र, वीभत्स हे मुळ असून त्यांच्यापासून हास्य,  करुण, अद्‌भूत, भयानक हे रस झाले असेही म्हटले जाते.
रसव्यवस्था ही मुळातच नाटक, महाकाव्ये, खंडकाव्ये इत्यादींच्या संदर्भातच सांगितली आहे. आज आपण दैनंदीन आयुष्यात आपल्या मनोरंजनासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आस्वाद हा घेतच असतो. अशा या आवडत्या गोष्टींमध्ये वरील आठ रसांपैकी एखाद्या रसाचा समावेश असतोच. त्यामुळे रस हे मानवाच्या आवडीशी संबंधीत घटक म्हणून पाहिला जातो. कारण त्या विशिष्ट गोष्टीत रसाचा समावेश असल्याने ती गोष्ट त्यांस आवडलेली असते.
वर उल्लेख केल्याप्रमाणे नाट्य आणि काव्य शास्त्रात ह्या रसांचा समावेश असतो. आज प्रत्येकाने आपापल्या परिने आमुक एक रस सर्वश्रेष्ठ किंवा रसांचा राजा  म्हणून संबोधले आहे. अभिनय क्षेत्रात यांपैकी रसांचा समावेश असतो, त्यामुळे त्या अभिनयात जिवंतपणा येत असतो. अनेक चित्रपट, नाटक, कादंब-या, काव्ये वाचल्या/पाहिल्या असतील. परंतु यामध्येही एखाद पात्र डोळ्यासमोर ठेवून त्या कथाप्रकाराला जिवंतपणा आणण्यासाठी रसांचा वापर केला जातो.

No comments:

Post a Comment