अलीकडे मात्र काबुकी शब्दातील तीन
ध्वनींवर आधारित असा या संज्ञेचा अर्थ करण्यात येतो, तो असा : ‘का’ म्हणजे गीत, ‘बु’ म्हणजे नृत्य
व ‘की’ म्हणजे अभिनय-कौशल्य. या वरून
गीत-नृत्य-नाट्य यांचा संगम म्हणजे काबुकी असे समीकरण रूढ झाले आहे. काबुकीचे अनेक प्रकार आहेत. काही ग्राम्य प्रकार तमाशासारखे
आहेत, तर इतर ऐतिहासिक किंवा नृत्ये असलेले आहेत.
काबुकी-नाट्यप्रकाराची सुरुवात १५९६ मधील
एका प्रसंगातून झाली, असे म्हटले जाते. पुराणकालीन कथाप्रसंग,
शोकांतिका ऐतिहासिक कथानके व सामाजिक प्रेमकथा हे आजच्या काबुकीचे
विषय आहेत. त्यांतील आविष्कार नृत्य व संगीत यांच्या द्वारे ढंगदार
शैलीने करण्यात येतो. कथानक
अगदी साधे आणि सर्वसाधारण एकाच प्रसंगावर आधारलेले असते. त्यातच मग विदूषकी प्रहसन, परंपरागत पद्धतीची भारी व
भडक रंगांची वेशभूषा, लेप,
मुखवटे, रंगीबेरंगी व झगमगीत रंगमंच या
साऱ्यांचे वैचित्र्यपूर्ण संमिश्रण केलेले असते..
काबुकी नाट्यप्रकारात परंपरेने सर्वांत अधिक
महत्व नटांना प्राप्त झाले आहे. तसेच त्यातील ‘नृत्य’ घटक अत्यंत महत्वाचा
मानला जातो. नृत्यप्रकारांची विविधताही त्यात आढळते. म्हणूनच संगीतिकेपेक्षा हा
प्रकार वेगळा व अधिक व्यापक ठरतो. फिरता रंगमंच, ट्रॅप-लिफ्ट
व हानामिची ही काबुकीची खास वैशिष्ट्ये आहेत.
नृत्य, नाट्य, संगीत, दृश्यसौंदर्य इ. अंगांनी परिपूर्ण असलेला हा
नाट्यप्रकार जागतिक रंगभूमीच्या क्षेत्रात अनन्यसाधारण मानला जातो. या नाट्यप्रकारात लवचिकता, विकसनशीलता
हेही गुण असल्याने आधुनिक काळात तो प्रभावी ठरला.
No comments:
Post a Comment